पुणे -संभाजी छत्रपती यांनी येत्या 7 जूनला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाला अजून वेळ आहे. आणखी 9 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल. या नऊ दिवसात खूप काही होईल.
चर्चा होईल, मार्ग निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले आहे. यावर विचारले असता पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले आहे. मग आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल.
कारण आम्हीही मराठाच आहोत. दरम्यान, आघाडी सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही आणि कुणाच्याही तक्रारी नाहीत. आघाडीचा कारभार चांगला सुरू आहे. सगळं व्यवस्थित सुरू आहे. कुठल्याही बाबतीत काहीही झालेलं नाही. शरद पवार जसा वेळ देतात, तसं मी त्यांना भेटतो.