मुंबई – विमान प्रवासादरम्यान विमानाच्या अपहरणाबद्दल बोलणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानामध्ये हा प्रवासी फोनवर ‘विमान अपहरण करण्याच्या प्लॅन’बद्दल बोलत असल्याचे ऐकू आले होते. विमान उड्डाण करण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेण्यात आले असे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रकार गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिल्लीला जाणारे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना एक प्रवासी फोनवर बोलत होता.’अहमदाबाद का फ्लाईट बोर्ड करने वाला है. कोई भी दिक्कत हो तो मुझे कॉल करना.’असे तो बोलत असल्याचे विमानातील कर्मचारी आणि अन्य प्रवाशांनी ऐकले. फोनवर बोलणारा प्रवासी “हायजॅक का सारा प्लॅनिंग है. उसका सारा ऍक्सेस है. चिंता मत करना’ असे देखील बोलत होता.
हे संभाषण ऐकल्यानंतर सर्व प्रवासी भयभीत झाले. त्यांनी त्वरित विमानातील कर्मचाऱ्यांकरवी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. हा 27 वर्षांचा प्रवासी मूळचा हरियाणातील असून त्याचे नाव रितेश जुनेजा आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसून 2021 पासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले.
या तरुणाला विमानातून उतरवून सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर हे विमान उर्वरित प्रवाशांसह दिल्लीला रवाना करण्यात आले.