हर्षवर्धन पाटील : इंदापूर विधानसभेसाठी अर्ज दाखल
रेडा- इंदापूर विधानसभेची निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने लढायची आहे या निवडणुकीच्या परीक्षेत मी पास होणार आहे; मात्र काठावर उत्तीर्ण होऊन चालणार नाही. आपण मागच्या बाकावर बसणारे नाहीत, त्यामुळे पुढचे बाक मिळण्यासाठी घवघवीत मताधिक्य देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभेसाठी हजारो मतदारांच्या उपस्थित गुरुवारी (दि, 3) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. यावेळी रासप शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्याची परंपरा सर्व जाती धर्मांना घेऊन विकास साधण्याचे आहे हीच परंपरा मी पुढेही आबादीत ठेवणार आहे. सर्व समाजातील घटकांना आधार वाटेल असे सरकार इंदापूर तालुक्यातील जनतेच्या पाठीशी उभे करायचे आहे.त्यामुळे विरोधी उमेदवारांना धूळ चारली पाहिजे.यासाठी रात्रं-दिवस मेहनत घेण्याची कार्यकर्त्यांची गरज आहे. आपले गाव सोडू नका, सर्व गावात कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे दुसऱ्या गावाची काळजी न करता आपल्या गावातील मतांची टक्केवारी महायुतीच्या पारड्यात पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. प्रचार काळात कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्यावर बर्फ ठेवून तोंडामध्ये खडीसाखर याप्रमाणे काम करणे गरजेचे आहे. मी जरी महा युतीचा उमेदवार असलो तरी जनतेचा उमेदवार म्हणून उभा आहे हे लक्षात घ्या, असे त्यांनी नमूद केले.