पिंपळे गुरव, दि. 15 – सुदर्शननगर येथील 8 टू 80 पार्कच्या जवळून बीआरटी मार्ग गेला आहे. हा मार्ग पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु या पार्कमध्ये बहुतांश नागरिक आपली वाहने बीआरटी मार्गातच पार्क करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथे बेशिस्तपणे गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख तसेच पुणे परिसरात पिंपळे गुरव येथील पीएमपी बस स्थानकांवरून गाड्या जातात. परंतु सुदर्शन नगर येथे महापालिकेच्या वतीने 8 टू 80 पार्क विकसित करण्यात आले आहे. या पार्कमध्ये शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व लहान मुलांची गर्दी पाहण्यास मिळते. या दिवसी पार्कमध्ये येणारे बहुतांश नागरिक आपली वाहने जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी लावून पार्कमध्ये आनंद घेत बसलेली असतात. परंतु या बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांचा इतर वाहनचालक व पीएमपी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात लावलेल्या वाहनांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच गाडी बाजूला घेण्यासाठी इतर वाहनचालक मोठ्याने हॉर्न वाजवतात. त्यामुळे शांततेचा भंग होऊन ध्वनिप्रदूषणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
8 टू 80 पार्क जवळून बीआरटीचा मोठा मार्ग जातो. या मार्गाने पिंपळे गुरव बस स्टॉप, पुणे, पिंपरी, पिंपळे सौदागर, भोसरी अशा विविध ठिकाणी ये-जा करण्यासाठी बस मिळतात. पिंपळे सौदागर आणि पिंपरीकडे जाणाऱ्या बसला मागील दोन दिवसांपूर्वी या बेशिस्त वाहन पार्किंगचा मोठा सामना करावा लागला.
पार्किंग पडते अपुरी
8 टू 80 पार्कच्या जवळ महापालिकेच्या वतीने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु ही व्यवस्था शनिवार आणि रविवारी अपूर्ण पडते. त्यामुळे पार्कमध्ये येणारे नागरिक आपली वाहने जेथे जागा मिळेल तेथे लावून पार्कमध्ये फिरण्यासाठी जातात. त्याचा त्रास इतर वाहनचालकांना होता. त्यामुळे महापालिका अथवा वाहतूक पोलिसांनी येथे वॉर्डन नेमून येथील वाहतुकीची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
पार्कजवळ होत असलेल्या वाहतूक कोंडीकडे आमचे लक्ष आहे. येथील पार्किंगची व्यवस्था पाहणाऱ्या ठेकेदाराचा ठेका संपला आहे. त्यामुळे आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तसेच माझ्याकडे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे वाहतूक नियमन करणे कठीण होत आहे. असाच प्रकार रक्षक सोसायटी व इतर ठिकाणीही घडत आहे. आम्ही नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत. परंतु नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. तरी देखील येथील समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
– प्रसाद गोकुळे, वाहतूक विभाग अधिकारी.