पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महामेट्रोने आठ स्थानकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही सेवा प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. प्रवाशांना या पार्किंगचा वापर करायचा असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषत: नोकरीसाठी सकाळी आणि संध्याकाळी मेट्रोचा वापर करणार्या चाकरमान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. कारण, मेट्रोच्या प्रवासी तिकीटापेक्षा पार्किंगसाठी द्यावे लागणारे शुल्कच अधिक आहे.
मेट्रोकडून पिंपरी-चिंचवड स्थानक, संत तुकाराम नगर स्थानक, फुगेवाडी स्थानक, बोपोडी स्थानक, शिवाजीनगर स्थानक, सिविल कोर्ट स्थानक, मंगळवार पेठ (आरटीओ) स्थानक, आयडियल कॉलनी मेट्रो स्थानक येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे, या पार्किगच्या संचलनासाठी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र, मेट्रो प्रवाशांसह कोणालाही या ठिकाणी वाहने पार्किंग करता येणार असल्याने येथेही जागा मिळणे अवघड होत आहे.
हेल्मेट ठेवायचे पाच रूपये…
पुणे मेट्रोची सेवा वनाज ते रूबी हाॅल तसेच पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट पर्यंत पुढे रूबी हाॅल ते रामवाडी आणि सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या मार्गावर सुरू होणार आहे. शासकीय कार्यालयात तसेच महापालिकेत कार्यरत कर्मचारी तसेच खासगी कंपन्याचे कर्मचारीही मेट्रो वापरतात. हे कर्मचारी मेट्रो स्थानकात दुचाकी लावून सकाळी कामावर जातात आणि संध्याकाळी येतात. मात्र, आता मेट्रो पार्किंग शुल्क आकारणार असल्याने या कर्मचार्यांना दिवसाला ६० रूपये तर कारसाठी ७० रूपये मोजावे लागणार आहेत. हे शुल्क तिकिटांच्या दुप्पट रकमेचे आहे. मेट्रोने प्रवास केल्यास पार्किंग शुल्कात २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर, पार्किंगच्या ठिकाणी हेल्मेट ठेवायचे असल्यास यासाठीही सुविधा असून पाच रूपये मोजावे लागणार आहेत.
वाहनांसाठी असे असेल शुल्क
वेळ…………..सायकल…………. दुचाकी …………….चारचाकी…………मोठी वाहने ( बस)
२ तास………….२…………………….१५……………………३५……………………५०
२ ते ६ तास……५…………………….३०……………………५०……………………७०
६ पेक्षा अधिक…१०………………….६०…………………..८०…………………….१००