इस्लामाबाद – पाकिस्तानमधील एका मंत्र्याने इस्लामी अध्यक्षीय पद्धतीचे कौतुक केले आहे. पाकिस्तानमध्ये अद्याप खऱ्या अर्थाने कधीही अध्यक्षीय पद्धत अस्तित्वात आलेली नाही. ही पद्धत स्वीकारायला पाहिजे, असे प्रतिपादन पाकिस्तानच्या मंत्रिमंडळातील संसदीय कामकाज मंत्री अली मुहम्मद खान यांनी केले आहे.
अध्यक्षीय पद्धतीबाबत केवळ सोशल मीडियातूनच चर्चा केली जात असते. मात्र सरकारी पातळीवर किंवा मंत्रिमंडळाच्या पातळीवर प्रत्यक्षात अध्यक्षीय पद्धतीबाबत काहीच चर्चा कधीच होत नाही, असे खान यांनी म्हटले आहे. या अध्यक्षीय पद्धतीबाबतचा निर्णय जनताच घेईल, असे सूचक विधानही खान यांनी याप्रसंगी केले आहे.
जर पाकिस्तानमध्ये इस्लामी अध्यक्षीय पद्धत स्वीकारायची असेल तर ती निवडणूकीच्या माध्यमातूनच स्वीकारली जावी. आयुब खान, झिया उल हक आणि परवेझ मुशर्रफ हे माजी लष्करी अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले नव्हते.
पाकिस्तानमध्ये अलिकडच्या काळात सोशल मीडियावरून अध्यक्षीय पद्धतीबाबत चर्चा झाली आहे. मात्र सध्या कोणत्याच राजकीय प7ाकडून अध्यक्षीय पद्धतीबाबत समर्थनाचे धोरण स्वीकारलेले नाही, असेही खान यांनी म्हटले आहे.