कराड – सातारा जिल्ह्यातील करोनाबाधितांचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यातील 15 करोनाबाधित रूग्ण सोमवारी (दि. 15) करोनामुक्त होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले 11 तर सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील 4 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्यासह हॉस्पिटलचे डीन डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. गेल्या महिनाभरात कराड तालुक्यातील बाबरमाची, आगाशिवनगर, मलकापूर, वनवासमाची, ओगलेवाडी, उंब्रज, चरेगाव, तांबवे, कापील, म्हारूगडेवाडी, कराड शहर तर नुकतचे नवीन सापडलेले गोटे, गमेवाडी व साकुर्डी येथील करोनाबाधित यांचा आकडा 87 वर जाऊन पोहचला आहे. या सर्व पॉझिटिव्ह रूग्णांच्या निकट सहवासीत असणारे अनेक लोक क्वारंटाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे कराड तालुक्यात कमालीचे भीतीचे वातावरण आहे.
तांबवे, म्हारूगडेवाडी आणि डेरवण येथील 10 महिन्याचे बालक ते 75 वर्षीय आजीबाई करोनामुक्त होऊन घरी परतल्या. त्यामुळे कराड तालुक्याला थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, बाबरमाची येथील करोनाबाधित रूग्णाची साखळी बघता बघता शतकाकडे वाटचाल करते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. दुसऱ्या बाजुला करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडाही वाढत होता. यासाठी जिल्हा व प्राथमिक आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वकर्स, पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन आदी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सोमवारी (दि. 11) कराड तालुक्यासाठी आनंदाची बातमी आली.
वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक आणि 13 वर्षीय मुलगा, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय युवक, 27 वर्षीय युवक आणि 65 वर्षीय वृध्द, कापील येथील 11 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, कामेरी (ता. शिराळा) येथील 48 वर्षीय पुरूष, मिरेवाडी (ता. फलटण) येथील 28 वर्षीय युवक असे 11 जण कृष्णा हॉस्पिटलमधून करोनामुक्त झाले. तर सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातून वनवासमाचीचे 3 व आगाशिवनगर येथील 1 जण करोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. अशाच पध्दतीने लवकरात लवकर कराड तालुका करोनामुक्त व्हावा, यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला साथ देण्याची गरज आहे.