पुणे –शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना धान्यादी माल वाटप करण्याचे काम महाराष्ट्र राज्य मध्यान्ह भोजन सेंट्रल किचन संघाला द्यावे अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा सेंट्रल किचनमधील महिलांनी दिला.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. करोनामुळे शाळा बंद होत्या. या कालावधीत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा राज्यस्तरीय पुरवठादारामार्फत झाला होता. महापालिका व नगरपालिका हद्दीत सेंर्टल किचन प्रणाली राबविण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासूण तिचे काम बंद आहे. यामुळे सेंट्रल किचनमधील महिला बचत गटांच्या महिलांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करून धान्यादी माल वाटप करण्याचे काम सेंट्रल किचनला देण्याऐवजी यासाठी निविदा मागविल्या आहेत. एकाच बड्या ठेकदाराला धान्यादी माल वाटपाच्या हालचाली सुरू असून हे अन्यायकारक आहे असे सेंट्रल किचनमधील महिलांचे म्हणणे आहे.
जून 2020 पासून धान्यादी माल खरेदी करून त्याचे वाटप करण्याचे वाटप सेंट्रल किचनला द्यावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांचे बिल लाभार्थ्यांप्रमाणे मिळावे, स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे अनुदान मिळावे, सेंट्रल किचनत्या खात्यावर अनुदान जमा व्हावे, आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी पुढील तीन वर्षांचा करार वाढवून द्यावा आदी मागण्या सेंट्रल किचन संघाने प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे केली आहे. जगताप यांना निवदेन देवून महिलांनी व्यथा मांडल्या. आठ दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असा आग्रहही धरण्यात आलेला आहे.