माजी सरपंच शिवदास उबाळे यांची माहिती
वाघोली- येथील सर्व ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व गावांतील लोकांसाठी एपीएल खालच्या लोकांना गहू व तांदूळ रेशन दुकानदारामार्फत वितरणासाठी उपलब्ध करून दिले असून, यामध्ये केशरी कार्डधारकांचासही समावेश करण्यात आला आहे. ऑनलाइन नोंदणी असो किंवा नसो सर्व केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये जिल्हा अधिकारी, पुणे यांनी धान्य उपलब्ध करून दिले असल्याची माहिती माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली आहे. धान्य वाटप काळात सुरक्षित अंतराचे पालन व्हावे, या पार्श्वभूमी आज (दि. 25) पासून रेशन दुकानदार प्रथम लाभार्थींच्या घरोघरी जाऊन धान्य खरेदीची पावती बनवतील आणि त्यानंतर वाटप वेळापत्रकप्रमाणे धान्य रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामध्ये गहू 8 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 12 रुपये प्रति किलो असा दर राहणार आहे. कार्डवरील प्रति व्यक्तीसाठी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. तसेच अन्त्योदय व अन्न सुरक्षा लाभार्थीला धान्य वितरीत केले जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच रोहिणी गोरे, मंडल अधिकारी किशोर शिंगोटे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.