मुंबई- सप्टेंबर महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक तब्बल 56.8 वर गेला आहे. सप्टेंबर महिन्यातील वाहन विक्री वाढली आहे. अर्थमंत्र्यांनी नव्या पॅकेजची शक्यता खुली ठेवली आहे. बऱ्याच ठिकाणचे आणखी काही उद्योग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात करून सकारात्मक संदेश आल्यामुळे शेअर बाजारात आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 629 अंकांनी म्हणजे 1.65 टक्क्यांनी वाढून 38,697 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 169 अंकांनी वाढून 11,416 अंकांवर बंद झाला.
आनंद राठी या संस्थेचे शेअरबाजार विश्लेषक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय सवलतीच्या काळात व्याज लावायचे की नाही याबाबत निर्णय घेणार आहे.
हा निर्णय संतुलित स्वरूपाचा असेल असे वाटणाऱ्या गुंतवणूकदारांनी बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. निर्देशांकांत एवढी मोठी वाढ झाल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम रुपयाच्या मूल्यावर होऊन रुपयाचे मूल्य गुरुवारी तब्बल 63 पैशांनी वाढले.
मल्टिप्लेक्स कंपन्या तेजीत
15 ऑक्टोबरपासून मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट 50टक्के क्षमतेने सुरू करण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर मल्टिप्लेक्स कंपन्यांच्या शेअरच्या भावात 18 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.
ज्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले, त्यामध्ये पीव्हीआर आयोनेक्स या कंपन्यांचा समावेश होता. मार्च महिन्यापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर प्रेक्षक चित्रपटगृहात येतील असे गुंतवणूकदारांना वाटते.