मुंबई – काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. मागील काही दिवसांपासून वारंवार अजित पवार शरद पवारांची भेट घेत आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यात आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून वडेट्टीवार यांनी धक्कादायक दावा केला आहे.
“शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना घातल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळेच ते सातत्याने शरद पवार यांना भेटून त्यांच्याकडे सोबत येण्याची दया-याचना करत आहेत,” अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
मात्र, अजित पवार यांच्या गटाकडून विजय वडेट्टीवार यांचा हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, “विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य बालिश आहे. पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना कोणतीही अट घातलेली नाही. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अजित पवारांसारखा मास लीडर सोबत असावा, असे भाजपला वाटले.
अजितदादांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळू शकेल, या आशेने भाजपने त्यांना सरकारमध्ये सामावून घेतले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी अनेकदा झाल्या आहेत. कधीकधी सार्वजनिक जीवनात वेगळी भूमिका घ्यावी लागते. याचा अर्थ वैयक्तिक संबंधांची ताटातूट होते, असे नाही. राजकीय विचार वेगळे असतील म्हणून शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांशी शत्रूसारखं का वागावं? हे पवार साहेबांचा संस्कार नाही. राजकारणात वेगळी भूमिका घेतली म्हणून शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांविरोधात तलवारी उपसून उभे राहावे का? असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला.
याआधी काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत देखील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असाच दावा केला होता. “विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले होते.