मुंबई – अभिनेत्री डेझी शाहला ‘जय हो’ चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटात तिने अभिनेता सलमान खानसोबत काम केले होते. बॉलिवूडमधील गटबाजीचा उल्लेख अनेक सेलिब्रिटींनी केला आहे. यामुळे इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला आहे. या गटबाजीची शिकार अभिनेत्री डेझी शाह देखील झाली होती. नुकतेच तिने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
एका मुलाखती दरम्यान डेझी म्हणाली की, “बॉलिवूडमधील गटबाजीचा मी एक भाग होते. मला त्या श्रेणीत टाकण्यात आले आणि इंडस्ट्रीतील लोक म्हणाले की तुम्ही त्याचा एक भाग आहात. माझ्यासोबत असे अनेकवेळा घडले आहे जेव्हा चित्रपट निर्माते म्हणायचे, ‘आम्ही ऑफर देऊ. आमचा एक प्रकल्प आहे. त्यासाठी कास्ट करायचे आहे, पण आम्हाला वाटते की तुम्ही त्या गटाचा भाग आहात, त्यामुळे तुमची फी देण्यासाठी आमच्याकडे पुरेसे बजेट नाही. चित्रपटाची कथा चांगली असती तर मी नक्कीच काम केले असते.”
पुढे ती म्हणाली की, “काम नसल्यामुळे मानसिक तणाव येऊ लागला, घराबाहेरही पडणे बंद केले होते. त्या गोष्टीचा माझ्यावर खरोखर परिणाम झाला. असे दिवस होते जेव्हा मी खूप अस्वस्थ व्हायचे, मला माझे घर सोडायचे नव्हते किंवा कोणाला भेटायचे नव्हते. मी माझ्या करिअरबद्दल अजिबात समाधानी नव्हते. कारण, बॉलिवूडमधील गटांमुळे माझे करिअर अजूनही सुरु झालेले नाही.”
मात्र या सगळ्यातून ती पुढे जात असल्याचेही तिने म्हंटले आहे. तिला इंडस्ट्रीकडून खूप काही मिळाले आहे. जे मिळालं नाही, त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे मिळाले त्यात आनंदी राहून तिच्या भवितव्याकडे पाहत असल्याचेही तिने सांगितले आहे. सध्या डेझी शाह सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’च्या 13व्या सीझनमध्ये स्टंट करताना दिसत आहेत.