T20 World Cup 2024 : भारत-कॅनडा आज आमने-सामने; सामन्यावर पावसाचे सावट…

फ्लोरिडा – भारत आणि कॅनडा यांच्यातील टी-20 विश्वकरंडक 2024 चा लीग सामना शनिवारी येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सध्या इथे पाऊस सतत पडत असला तरी, तरीही जगातील महान क्रिकेटपटूंनी सजलेल्या भारतीय संघासमोर काही भारतीय खेळाडूंचा आंतर्भाव असलेल्या कॅनडा संघाला नक्कीच आव्हान द्यायला आवडेल.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा निर्णय घेऊ शकतो. कारण, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 700 हून अधिक धावा केल्यानंतर विश्वकरंडकात आलेल्या स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण, आयपीएलमध्ये अगदी खणखणीत वाजणारे विराट कोहली नावाचे नाणं टी-२० विश्वकरंडकात मात्र फिकं पडले आहे. विश्वकरंडकात कोहली सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे.
आत्तापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत कोहली 1.66 च्या सरासरीने केवळ पाच धावाच करू शकला आहे, ज्यामध्ये अमेरिकेविरुद्ध ‘गोल्डन डक’ (पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद होणे) देखील समाविष्ट आहे. त्यामुळे, स्पर्धेच्या महत्वपूर्ण टप्प्यावर भारताला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवायचे असल्यास कोहलीचे फॉर्ममध्ये परतने अत्यंत आवश्यक आहे. कोहलीने विश्वकरंडकात सातत्याने खराब कामगिरी केली असली तरी त्याच्या संघाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे, कोहलीवर दबाव कमी असला तरी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करताना दिसू शकतो. कोहलीने आत्तापर्यंत विश्वकरंडकात रोहितसह सलामी दिली आहे.
मात्र, कोहली लवकर बाद होत असल्याने संघाची चांगली सुरुवात होत नाही व त्यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दडपण येत आहे.
जैस्वाल रोहितसह सलामीला…
ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज मात्र कोहलीच्या खराब कामगिरीची भरपाई करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आहेत. पंतने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे 36 आणि 42 धावांची खेळी खेळून दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सूर्यकुमारनेही स्पर्धेतील खराब सुरुवातीतून सावरताना अमेरिकेविरुद्ध महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. शिवम दुबेनेही सह-यजमानांविरुद्ध 35 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. त्यामुळे रोहितने यशस्वी जैस्वालला संधी दिल्यास तो डावाची सुरुवात करेल आणि अशा स्थितीत कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर परतावे लागण्याची शक्यता आहे.





