मुंबई -भांडवल तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या येस बॅंकेच्या कामकाजावर गुरूवारी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) विविध स्वरूपाचे निर्बंध लादले. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत खातेदारांना केवळ 50 हजार रूपयेच काढता येऊ शकतील. येस बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.
आता त्या बॅंकेच्या प्रशासकपदी भारतीय स्टेट बॅंकेचे (एसबीआय) माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आरबीआयकडून पीएमसी बॅंकेबाबत अशीच पाऊले उचलण्यात आली होती.
येस बॅंकेला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी एसबीआय आणि इतर काही वित्तसंस्था मदतीचा हात पुढे करणार आहेत. त्याला सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त सकाळी पुढे आले होते. मात्र, सायंकाळी आरबीआयने निवेदन जारी करून येस बॅंकेविषयीच्या पाऊलांची माहिती दिली.