पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने शाळाबाह्य वयानुरुप प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागाकडून 15 जूनपासून ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले आहे. विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वयानुरुप प्रवेशित मुलांसाठी पूरक अध्ययन साहित्याची निर्मिती केली आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्र-भाषा, गणित तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित या विषयांसाठी शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका तयार केल्या आहेत.
2019-20 मध्ये 7 हजार 321 शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. यात पहिली ते चौथीसाठीचे 4 हजार 91, तर पाचवी ते आठवीसाठीचे 3 हजार 238 विद्यार्थी आहेत. त्यांना इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वयानुरुप प्रवेश दिले आहेत. इयत्ता पहिली ते चौथीच्या 1 हजार 202 शाळांमधील 1 हजार 615 शिक्षक, पाचवी ते आठवीच्या 769 शाळांमधील 1 हजार 522 शिक्षक अशा एकूण 3 हजार 137 शिक्षकांना झुमद्वारे दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.