निसर्गाच्या तडाख्यात शेतकऱ्यांची वर्षभराची जमापुंजी हिरावली
सोरतापवाडी-पूर्व हवेलीतील फूलशेती परराज्यात प्रसिद्ध आहे. पोषक वातावरण, ऊस शेतीला फाटा, बाजारपेठ, वाहतूक दळणवळणाच्या सुविधा आदीच्या जोरावर फूल उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्व हवेलीतील फुलांचा दरवळ आता परराज्यात पोहचविला आहे. मात्र, परतीच्या आणि वादळी पावसाने फूलशेती कोमेजून गेली आहे. यंदा शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे निसर्गाच्या तडाख्याने शेतकऱ्यांची वर्षभराची जमापुंजी हिरावून नेली आहे.
पूर्व हवेलीतील कदमवाकस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे, आळंदी म्हातोबाची, कोरेगाव मूळ, उरुळी काचंन, शिंदवणे, वळती आदी गावांत फूलशेतीचे क्षेत्र लक्षणीय आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत देशभरातील बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि नगदी पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी फूलशेती जीवापाड जोपासली आहे.
यंदा उन्हाळ्याची झळ पूर्व हवेलीला सोसावी लागली आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर समाधानकारक पाऊस पडला होता. त्यामुळे फूलशेती चांगलीच बहरली होती. जुलै महिन्यात थोडासा फटका बसला होता. त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्र, दसरा, दीपावलीसाठी बाजारभाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊ लागला. परतीच्या पावसामुळे विस्कळीत शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम झाला आहे.
उसासह मका, कांदे, बाजरीचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली बाजरी मातीमोल झाली आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फूलशेतीला सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
- उत्पादन खर्च लाखांत…
पूर्व हवेलीतील फूलशेतीसाठी शेतकरी सुमारे दोन ते तीन लाखांचा खर्च करतात. त्यासाठी गुंतवणूक करताना शेतकरी बॅंका, पतसंस्था, सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज उभारणी करीत आहेत. एक एकर फूलशेतीला सुमारे दोन ते तीन लाख रुपये उत्पादन खर्च येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील भावानुसार दर मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांनी लाखांत खर्च केला आहे. मात्र, उत्पादन खर्च वजावट जाता शेतकऱ्यांच्या पदरात फुटकी दमडी मिळणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.