अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

शिक्रापूर : रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील एका कार्यक्रमा दरम्यान प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक हिच्याशी गैरप्रकार करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. नाईक यांनी मुंबईतील साकीनाका येथे गुन्हा दाखल केला होता. साकीनाका पोलिसांनी गुन्हा रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सविस्तर घटना अशी रांजणगाव गणपती ता. शिरूर येथील युवा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संतोष पोटे यांनी सदरील ऑपरेटरला बाहेर बाहेर जाण्यास सांगितले होते.

मानसी नाईक यांनी घडलेला प्रकार कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संतोष पोटे याना सांगितला असता पोटे आणि त्यांच्या पत्नीने नाईक यांच्यासोबत वाद घातला होता. तसेच नाईक यांच्या आईला फोन करून दमदाटी केली होती. तुमचे सर्व व्हिडीओ काढले आहेत, जास्त नाटके केली तर व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देखील त्यांना दिली होती.

त्यांनतर अभिनेत्री मानसी राजन नाईक यांनी साकीनाका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. साकीनाका पोलिसांनी डॉ. संतोष पोटे आणि डॉ. सुनिता पोटे दोघे रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे या पती-पत्नींसह एका अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केला होता.

सदर गुन्हा रांजणगाव पोलिसांकडे वर्ग होताच पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या अजय अशोक कल्याणकर वय २३ वर्षे रा. पर्वतीदर्शन ता. हवेली जि. पुणे याला पुणे येथून अटक केली. तसेच या गुन्ह्यातील डॉ. संतोष पोटे आणि  डॉ. सुनिता पोटे यांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी दिली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.