पुसेगाव, (प्रतिनिधी) – वर्धनगड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये तत्कालीन सचिव, बँक विकास अधिकारी व संचालक मंडळाने एक कोटी ६२ लाख ३५ हजारांहून अधिक रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार लेखापरीक्षक सुशीलकुमार कांबळे यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्यासह जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कांबळे यांच्या फिर्यादीवरून पुसेगाव पोलिसांनी विकास सेवा सोसायटीचे तत्कालीन सचिव सुगंध आनंदराव साळुंखे (रा. विसापूर, ता. खटाव), सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक पुसेगाव शाखेचे तत्कालीन बँक विकास अधिकारी अजित शिवाजीराव घाटगे (रा. डिस्कळ, ता. खटाव), सोसायटीचे तत्कालीन चेअरमन अर्जुन बाबुराव जाधव,
व्हा. चेअरमन लक्ष्मी आनंदराव घोरपडे, संचालक राजाराम मुगुटराव अनपट, पोपट व्यंकट चव्हाण, तुषार चंद्रकांत कोठावळे, शंकर नारायण पवार, बळवंत नामदेव पाचांगणे, राजेश यशवंत जाधव, अंकुश दादा पाचांगणे, विठाबाई ज्योतिराम पाचांगणे, विजय भानुदास भस्मे, भीमराव तुकाराम बनसोडे, रामचंद्र जयसिंग गिरीगोसावी (सर्व रा. वर्धनगड, ता. खटाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दि. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे.
सुशीलकुमार कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन सचिव, बँक विकास अधिकारी व संचालक मंडळाने संगनमत करून वर्धनगड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमधील संस्थेच्या मंजूर असलेल्या कमाल मर्यादा पत्रकात खाडाखोड करुन व्हाईटनर लावून ४३ कर्जदार सभासदांना कर्ज वाटप केले.
एकूण ३० कर्जदार सभासदांना दिलेल्या कर्जापोटी सभासदांच्या कोऱ्या विड्रॉल स्लीपवर सह्या घेऊन त्यांच्या खात्यावरील परस्पर रकमा काढून त्या रकमेचा स्वतःचा फायद्याकरता वापर केला आहे.तपास पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
असा आहे घोटाळा
कर्जदारांच्या कर्जाच्या रकमा वसूल करुन त्यांना कर्ज जमा झाल्याच्या पावत्या न देणे. कर्ज खतावणी रजिस्टरला कर्ज कमी झाल्याबाबत नोंद न करणे. कर्जदार सभासदांना कर्जाची निरंक दाखले देऊन ही कर्ज खतावणी रजिस्टरला येणे बाकी कर्ज दर्शवणे. एकूण १५ कर्जदार सभासदांचा आलेला वसूल जमा पावत्यांनुसार वसुली रजिस्टरला व किर्दीला नोंद न करता स्वतःच्या लाभाकरता त्या रकमेचा अपहार करणे.
कर्जदार सभासदांच्या कर्जापोटी आलेला वसूल मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज खतावणी रजिस्टरला नोंदी करुन कर्जाची येणे बाकी रक्कम कमी करणे. आलेला वसूल रोज किर्दिस न घेणे. रकमेचा बँक शाखेत भरणा न करणे. त्या रकमेचा परस्पर अपहार करणे. पूर्वीचे सामान्य, मध्यम, दीर्घ मुदत पीक कर्ज थकीत असताना नवीन कर्जाचे दुबार वाटप करणे.
पूर्वीचे मुदत कर्ज थकीत असताना सभासदांना नवीन कर्ज वाटप करणे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना सन २०१९ अंतर्गत अपात्र असणाऱ्या सभासदांना लाभ देणे. हे गैर प्रकार करुन तत्कालीन सचिव बँक विकास अधिकारी व संचालक मंडळ यांनी अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.