सातारा, (प्रतिनिधी) – शाहूपुरी व परिसरात नगरपालिकेच्यावतीने कचरा निर्मुलनासाठी राबवण्यात येत असलेल्या घटागाड्यांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी शाहूपुरीत कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या भारत भोसले यांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुन पूर्वीपासून असलेली ट्रॅक्टर व्यवस्था पूर्ववत सुरु ठेवावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून शाहूपुरी प्रभाग क्रमांक -१० अंतर्गतचे कचरा संकलनाचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. नगरपालिका प्रशासनाचे आरोग्य अधिकारी प्रविण यादव यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा देत घंटागाडीचे सुधारीत नियोजन सांगितले आहे.
आमच्या भौगोलिकदृष्ट्या मोठ्या भागास पूर्वी ट्रॅक्टरद्वारे कचरा गोळा केला जात होता. अचानक कोणतेही सबळ कारण नसताना ट्रॅक्टर व्यवस्था बंद करून छोट्या दोन गाड्या लावल्या आहेत. ज्या गाड्या लावल्या आहेत त्या गाड्या सुध्दा नियमित येत नाहीत.
परिणामी नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असून कचरा समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. शाहूपुरी परिसरात पूर्वीपासून असलेली ट्रॅक्टर व्यवस्था पूर्ववत सुरु ठेवून सहकार्य करावे, अशी मागणी श्री. भोसले यांनी केली आहे.