जोहन्सबर्ग : आपल्या छोट्या कसोटी कारकिर्दीत, शार्दुल ठाकूरने यापूर्वीच भारतीय संघातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ’पालघर एक्सप्रेस’ म्हणून ओळख असलेल्या शार्दूल ठाकूरने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
मात्र दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, शार्दुल ठाकूरने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा कसोटी संघात पुनरागमन केले. गाब्बा येथे भारताच्या ऐतिहासिक विजयात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
तेव्हापासून ठाकूरने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करणे सुरूच ठेवले आहे. संघात अष्टपैलू म्हणून आपले स्थान निर्माण करत असलेल्या ठाकूरच्या नावावर आधीच तीन अर्धशतके आहेत.
आतापर्यंतच्या 6 कसोटी सामन्यांमध्ये मुंबईच्या या अष्टपैलू खेळाडूच्या नावावर 23 बळी आणि 3 अर्ध शतकांसरह 204 धावा आहेत. या लेखातून आपण शार्दुल ठाकूरच्या कसोटी क्रिकेटमधील तीन सर्वोत्तम कामगिरींवर नजर टाकणार आहोत.
ऐतिहासिक गाबा, 2021
भारताच्या सर्वात मोठ्या कसोटी मालिका विजयाचा एक भाग म्हणून 2020-2021 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालीका शार्दुल ठाकूरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील स्वतःसाठी एक अध्याय असेल. दोन वर्षांच्या अंतरानंतर कसोटी संघात पुनरागमन करत आपली छाप सोडण्याची संधी शार्दूलने वाया घालवली नाही.
ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिली कसोटी आणि कारकिर्दीतील दुसरी कसोटी खेळताना, शार्दूल ठाकूरने द गाबा येथे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 94 धावा देत 3 बळी तर दुसर्या डावात 61 धावा देत 4 फलंदाजांची शिकार केली. शिवाय, शार्दूलने आफल्या आक्रमक फलंदाजीनेही
सर्वाना आश्चर्यचकित केले कारण त्याने मालिकेतील निर्णायक सामन्यात अत्यंत दबावाखाली आपले पहिले कसोटी अर्धशतक साजरे केले. 29 वर्षीय खेळाडूने नवोदित वॉशिंग्टन सुंदरसोबत 123 धावांची भागीदारी करून भारताची पहिल्या डावातील पिछाडी केवळ 33 धावांवर आणली.
द गाबा येथे त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे, शार्दुल ठाकूर हा एकाच कसोटी सामन्यात 60 पेक्षा जास्त धावा आणि 7 किंवा अधिक बळी घेणारा तसेच दोन किंवा अधिक झेल घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला.
वांडरर्सवर विश्वविक्रम, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या कसोटीच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 4 जानेवारी 2022 रोजी शार्दुल ठाकूरने दबदस्त गोलंदाजी करत भारताला समन्यात दमदार पुनरागमन करुन दिले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत जोहान्सबर्ग येथील वांडरर्स मैदानावर 7 बळी घेणारा तो पहिला भारतीय आणि आशियाई गोलंदाज ठरला.
शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 61 धावांत 7 बळी घेतले. 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यापासून वांडरर्समधील परदेशी खेळाडूसाठी ही संयुक्त-सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या मॅथ्यू हॉगार्डने 2004/05 मध्ये इतक्याच धावा देत 7 बळी घेतले होते.
अविस्मरणीय ओव्हल, 2021
इंग्लंडविरुद्ध 2021 मध्ये झाल्येला पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात द ओव्हल क्रिकेट मैदानावर शार्दूल ठाकूरने अष्टपैलू कामगिरी करत भारताला दमदार विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे शार्दूलला इंग्लंडचे दिग्गज अष्टपैलू सर इयान बॉथम यांच्याकडून वाहवा मिळाली.
या सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतके आणि सामन्यात 3 बळींसह ठाकूरने आपल्या संघाला मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात इंग्लंडच्या दुसर्या डावात ठाकूरची आठ षटके भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.