बर्लिन – जर्मनीच्या चॅन्सेलरपदाची सूत्रे ओलाफ स्चोल्झ यांनी आज स्वीकारली. जर्मनीच्या संसदेने स्चोल्झ यांच्या चॅन्सेलरपदावरील निवडीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. अँजेला मर्केल यांच्या 16 वर्षांच्या चॅन्सेलरपदाच्या कार्यकाळाची आज अधिकृतपणे अखेर झाली.
स्चोल्झ हे तीन पक्षांच्या आघाडीकडे संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील 736 सदस्यांपैकी 416 सदस्यांचे बहुमत आहे. संसदेमध्ये झालेल्या मतदानामध्ये स्चोल्झ यांच्या बाजूने 395 लोकप्रतिनिधींनी मतदान केले. आज जालेले मतदान आणि स्चोल्झ यांची चॅन्सेलरपदावरील निवड ही एक औपचारिकता होती. संसदेच्या सभापतींकडून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा झाल्यावर त्यांनी चॅन्सेलर पदाची औपचारिक सूत्रे स्वीकारली.
जर्मनीला आधुनिकीकरणाच्या नवीन आशा असतानाच स्चोल्झ यांनी चॅन्सेलरपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जर्मनीसमोर वातावरण बदलाचेही मोठे आव्हान आहे. त्याचाही स्चोल्झ यांच्या सरकारला सामना करावा लागणार आहे. या आव्हानांव्यतिरिक्त करोना साथीनंतर डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला उबारी देणे हे स्चोल्झ यांच्या सरकारपुढील सर्वात तातडीचे आणि महत्वाचे आव्हान असणार आहे.
मर्केल यांच्या कार्यकाळाने घडवला इतिहास
अँजेला मर्केल यांची 22 नोव्हेंबर 2005 रोजी जर्मनीच्या चॅन्सेलर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांची कारकिर्द ही इतिहासात दखल घ्यावी लागेल अशी ठरली. कारण पुढील 16 वर्षात जर्मनीला जागतिक पातळीवर श्रेष्ठत्व आणि प्रभावशाली देश म्हणून गौरव प्राप्त करून देण्याचे श्रेय त्यांच्या कारकिर्दीलाच मिळते. जर्मनीतील विविध गटांना एकत्र करण्यापासून नैसर्गिक आपत्तीत जर्मनीला एकसंधपणे सामोरे जाण्याची शक्ती मर्केल यांनी निर्माण केली.
पाश्चात्य देशांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य होते. मर्केल यांच्या कारकिर्दीच्या काळात अमेरिकेचे 4 अध्यक्ष, फ्रान्सचे 4 अध्यक्ष, ब्रिटनच्या संसदेचे 5 पंतप्रधान, इटलीत 8 पंतप्रधान होऊन गेले होते.