बाभळेश्वर – कर्नाटकात कॉंग्रेस स्वबळावर सत्तेवर येत असून पक्षाला 130 पेक्षाही अधिक जागा मिळतील. त्यामुळे आता कर्नाटकात भाजपला ऑपरेशन कमळ राबवता येणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ कॉंग्रेस नेते एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावरून पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत. पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगण्यात काहीही गैर नाही. शेवटी त्याविषयी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.
पाटील हे कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत. जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी सारखे नेते पक्षात घेतल्याने तुम्हाला बाजुला सारले गेल्या सारखे वाटते आहे काय असे विचारता ते म्हणाले की, असे काहीही झालेले नाही आणि माझे महत्व कमी करण्याचा कोणताहीं प्रयत्न केला जात नाही. पाटील हे स्वता बाभळेश्वर मतदार संघातून यंदा निवडणूक लढवत आहेत.
ते म्हणाले की यावेळी भाजप आणि जेडीएस पक्षांना बुहमताच्या जवळ जाणारे संख्याबळ मिळणार नाही, त्यामुळे यावेळी ऑपरेशन कमळचाही उपयोग होणार नाही. सन 2018 च्या निवडणुकीतही भाजपला पुर्ण बहुमत मिळाले नव्हते. त्यांनी त्यावेळी दुसऱ्या पक्षाच्या आमदारांना फोडून सत्ता बनवली होती.
त्यावेळी येडियुरप्पा यांच्या सारख्या ज्येष्ठ लिंगायत नेत्याला मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केले गेले होते परंतु तरीही त्या पक्षाला त्यावेळी बहुमत मिळाले नव्हते ही बाब त्यांनी ध्यानात आणून दिली. यावेळी आता भाजप सत्तेच्या जवळपासही दिसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.