मुंबई – लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या “स्पायनल मस्क्युलर ट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
या सुविधेसोबतच मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब देखील सुरू करण्यात आली असून करोनाविरुद्धच्या लढ्याला बळ प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले, स्पायनल मस्क्युलर ट्रोफीसारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले.
तिला 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. भविष्यात या आजाराने लहान मुले दगावू नयेत म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत.
त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज आहे. आजपासून नायर रुग्णालयात “स्पायनल मस्क्युलर ट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे. अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील 17 रुग्णांना त्याचा लाभ होईल.
करोनाविरुद्धची लढाई दीड वर्षांपासून सुरू असून त्यात डॉक्टर्स, कर्मचारी खंबीरपणे लढत आहेत. या परिश्रमामुळे लाखो नागरिकांना जीवनदान देण्याचे काम झाले आहे. मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जगात मुंबई मॉडेलचे कौतुक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
करोना विरुद्धच्या लढ्याला बळ
करोनाचा विषाणू नवीन अवतार घेत असतो. विषाणूने बदलेला अवतार शोधून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग लॅब उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अशी लॅब असणे गरजेचे होते. ही लॅब आजपासून कार्यरत होईल. त्यामुळे करोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.