श्रीगोंदा -शहरातील प्रसिद्ध डॉक्टर व माजी नगरसेवक अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लाडक्या बहिणीला भेटण्याची इच्छा होती. बहिण आजारी असताना भेट झाली नाही. अन् दुर्दैवाने शेवटची भेट अखेर राहूनच गेली. श्रीगोंद्यातील घोडके परिवाराने फेसबुकवर अश्रू नयनांनी तिला अखेरचा निरोप दिला.
श्रीगोंदा येथील भीमराव घोडके यांना अनिल, बाबासाहेब, सूर्यकांत, मीना, वैजंता, शोभा असे तीन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. वैजंता सर्व भावंडाची लाडकी बहीण होती. काही दिवसांपासून वैजंता आजारी होती. लॉकडाऊनमुळे तिला कोणालाही भेटायलाही जाता आले नाही. सोमवारी तिने शेवटचा श्वास घेतला. ही दु:खाची बातमी समजली. तिच्या अंत्यविधीला जाण्याची सर्वांची खूप इच्छा होती. मंगळवारी सकाळी अंत्यसंस्काराचा सोहळा फेसबुकवर लाईव्ह करण्यात आला. घोडके परिवाराने श्रीगोंद्यातून तिला अखेरचा निरोप दिला.