हेमंत देसाई
फेसबुकचे नवे तंत्रज्ञान हे स्वागतार्ह आहे; परंतु ते कितपत लोकोपयोगी ठरेल, ते प्रत्यक्ष अनुभवांतीच लक्षात येईल.
आर्यन शाहरुख खानची जामीनविषयक कागदपत्रे न्यायालातून आर्थर रोड तुरुंगात येण्यास दीर्घ अवधी लागला आणि तरीही भारतात डिजिटल क्रांती झालेली आहे, असे आपण मानायचे. हा गमतीचा भाग सोडला, तरी सध्या या क्रांतीबरोबरच समाजमाध्यमांची क्रांती आपण अनुभवतो आहोत. या पार्श्वभूमीवर, रिब्रॅंडिगच्या दृष्टीने फेसबुकचे नाव बदलून ते “मेटाव्हर्स’ असे केले गेले आहे. इंटरनेटद्वारे लोक जेव्हा आभासी जगात भ्रमंती करतात,
तेव्हा त्याला मेटाव्हर्स असे म्हणतात आणि त्यात डिजिटल अवकाशाचाही समावेश होतो. व्हर्च्युअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आभासी जगाला “डिजिटल स्पेस’ असे म्हणतात. या रिब्रॅंडिंगद्वारे फेसबुक कंपनी आणखी एका मोठ्या क्षेत्रात पूर्णपणे वेगळी सेवा देऊ पाहात आहे. इन्स्टाग्राम व व्हॉट्सऍपसारखी लोकप्रिय समाजमाध्यमे फेसबुकच्या छताखाली आली आहेत.
असे असले, तरी फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्गला समाजमाध्यम कंपनी ही फेसबुकची ओळख मागे टाकायची आहे. समाजतंत्रज्ञान कंपनी असा चेहरा देण्यासाठी त्याने फेसबुकचे नामांतर “मेटा’ असे केले आहे. मेटा अर्थात मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाला समाजमाध्यम जगताचे भविष्य म्हणून बघितले जाते. मायक्रोसॉफ्टसारखी बिल गेट्सची कंपनीदेखील या तंत्रज्ञानावर काम करत आहे.
झुकेरबर्गला भविष्यकालीन विज्ञान-तंत्रज्ञानाची जाण आहे आणि बदलते अर्थव्यवहार आणि व्यापाराचेही भान आहे. हे तंत्रज्ञान उद्या लोकप्रिय होणार आहे, ही खात्री असल्यामुळेच त्याने त्यासाठी दहा हजार नवीन तंत्रज्ञान कंपनीत घेण्याची तयारी केली असल्याचे सांगण्यात येते. करोनाच्या काळात लोकांचे घराबाहेर पडणे बंद झाले वा कमी झाले. त्यामुळे अपरिहार्यपणे कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम’ची पद्धत सुरू केली आणि करोना जवळजवळ संपला तरी हीच पद्धत चालू ठेवण्याचे अनेक कंपन्यांनी ठरवले आहे.
कारण त्यामुळे जाण्या-येण्याचे कष्ट आणि वेळ वाचतो. ऑफिसच्या जागेचा खर्चही वाचतो. वर्क फ्रॉम होममध्ये झूम, गुगल मीटसारख्या ऍप्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल टीम मीटिंग होते. त्यात आपण उपस्थित राहू शकतो; परंतु मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या व्यक्तीला फोन केला असेल, ती जिथे असेल तिथे तिच्यासमोर डिजिटल स्वरूपात आपण प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेऊ शकतो. प्रत्यक्ष हजेरी न लावता, आभासी पद्धतीने आपण चित्रप्रदर्शन असो वा संगीत मैफल असो. तेथे हजेरी लावू शकतो. अर्थात, मेटाव्हर्स तंत्रज्ञानात सर्वसामान्य माणसाची गोपनीय माहिती टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या हाती लागून त्याचा दुरुपयोग होण्याचा धोका आहेच.
अशा खासगी माहितीचा स्वार्थासाठी उपयोग करण्याबद्दल फेसबुकची “कीर्ती’ आहेच. मेटाचा लोगो अनंत अवकाशाचे प्रतीक आहे. आभासी जगात आपण पाऊल रोवत आहोत, हे त्यातून स्पष्टपणे अधोरेखित केलेले आहे. “मेटा इज हेल्पिंग टू बिल्ड द मेटाव्हर्स, अ प्लेस व्हेअर वुइ विल प्ले अँड कनेक्ट इन थ्री डी. वेलकम टू द नेक्स्ट चॅप्टर ऑफ सोशल कनेक्शन’, असे ट्विट मार्केने केले आहे.
जगामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे उत्पादन म्हणजे फेसबुक. समाजमाध्यम ब्रॅंड म्हणून तो यशस्वी असला, तरी आम्ही जे जे करतो, ते सर्व हा ब्रॅंड सामावून घेतो असे नाही. आम्ही लोकांशी कनेक्ट होण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करतो. म्हणूनच मेटाव्हर्स ही आमची नवीन आघाडी आहे, असे मार्कने स्पष्ट केले आहे. मेटा हा मूळ ग्रीक शब्द असून, त्याचा अर्थ बियॉंड, म्हणजे पलीकडे असा आहे. नवनवीन गोष्टींचा शोध घेऊन उद्याच्या विश्वाची उभारणी करणे, हे त्यात अभिप्रेत आहे. गुगलनेदेखील 2015 साली असा फेरबदल केला होता.
त्यावेळी आपल्या पालक कंपनीचे नाव गुगलने अल्फाबेट असे ठेवले होते. नाव बदलले म्हणजे कंपनीची मूळ रचना बदलेल, असे मुळीच नव्हे. परंतु आर्थिक निकाल जाहीर करण्याची पद्धती मात्र बदलेल. “फॅमिली ऑफ ऍप्स’ आणि “रिऍलिटी लॅब्ज’ या दोन विभागांत विभागणी करून आर्थिक निकाल घोषित केले जातील.
एक डिसेंबरपासून एमव्हीआरएस या नवीन स्टॉक टिकरच्या अंतर्गत फेसबुक म्हणजे मेटा व्यवहार सुरू करणार आहे. प्रोजेक्ट कॅम्बरिया, या व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट या प्रॉडक्टचीही घोषणा करण्यात आली असून, तो पुढील वर्षी बाजारात येणार आहे. प्रोजेक्ट नजारे, या पूर्णतः एआर सक्षम स्मार्ट ग्लासेसच्या प्रकल्पाचीही घोषणा करण्यात आली आहे.
इंटरनेटच्या भविष्यकालीन व्यक्तिमत्त्वाचा चेहरा पलटावून टाकणारा हा मेटा प्रकल्प आहे. मात्र हे प्रत्यक्षात कसे येते आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना कसा होतो, हे बघायला हवे. मात्र फेसबुकवरील पोस्टमुळे विविध देशांत कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत फेसबुककडून अपेक्षाभंगही झाला आहे.
जास्तीत जास्त फायदा कमावण्यासाठी सॉफ्ट पोर्नबरोबरच भडकावू पोस्ट सजेस्ट करण्याचा प्रयत्नही फेसबुककडून झाल्याचा आरोप आहे. तसेच आपल्या व्यासपीठावरील आशयावर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकतर्फे खर्च केला जातो, पण त्यातील बहुतांश निधी हा उत्तर अमेरिकेतील वापरकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठीच केला जातो.
भारतात फेसबुकचे 34 कोटी ग्राहक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मार्क झुकेरबर्गची भेट घेऊन जाहीर गप्पागोष्टीही केल्या; परंतु त्याचा भारताला काय उपयोग झाला, हे बघायला लागेल. कारण, भारतात 22 अधिकृत भाषा असल्या, तरी हिंदी-बंगाली सोडून अन्य भाषांतील मजकुरावर फेसबुक लक्ष ठेवत नाही. तसेच सत्ताधारी पक्षाच्या बाजूने फेसबुक झुकलेले आहे. हा अनुभव केवळ भारतालाच नाही, तर जगभरातील आहे.