वाघोली – तालुका हवेली येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे संपत गाडे यांनी नागरिकांमध्ये अध्यात्माचे संस्कार रुजवण्यासाठी संत साहित्य संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी,पांडुरंग, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती भेट देऊन अभिनव उपक्रम जोपासला आहे.
वाघोली आणि पंचक्रोशी मधील सर्वसामान्य नागरिक सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या वाढदिवसाला संत तुकाराम महाराजांची गाथा, संत तुकाराम महाराजांचा पेहराव असलेली पगडी, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती, संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट देऊन संत साहित्याचा अनोखा प्रचार करत नागरिकांमध्ये अध्यात्माची संस्कार रुजवण्यासाठी प्रबोधन केले आहे.
या उपक्रमाची दखल देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, राज ठाकरे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, उदय सामंत, अतुल सावे, गिरीश महाजन आदी मंडळींनी घेतली आहे. याबाबत समाज सुधारक संपत गाडे यांनी सांगितले की, नागरिकांमध्ये वारकरी संप्रदायाची शिकवण तसेच संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने नागरिकांना संत साहित्य तसेच मूर्ती भेट देऊन भक्ती शक्ती चा महिमा अनुभवता यावा यासाठी हा उपक्रम राबवला असून हजारो नागरिकांना आज अखेरपर्यंत पुस्तके व मूर्ती भेट दिल्या आहेत. सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने गाडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत तुकारामांची गाथा संपत गाडे यांनी भेट देऊन आषाढी कार्तिकी सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
पंढरीची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना जे पुण्य पंढरपूरला जाऊन लाभत आहे तेच पुण्य संत साहित्याचा प्रचार प्रसार करून संपत गाडे यांना लाभत असल्याचे महाराष्ट्र जनता दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे म्हणाले.