नवी दिल्ली – भारताला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देणाऱ्या नीरज चोप्राने आपल्या ट्विटर खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. नीरजने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान, स्पर्धेवेळी आपला भाला पाकिस्तानी खेळाडू नदीम याच्याकडे होता. त्याच्याकडून तो मागून घेतला. त्यामुळे पहिला थ्रो करताना घाई झाल्याचं त्याने सांगितलं होत. त्याच्या याच वक्तव्याचा विपर्यास करत काही वृत्त वाहिन्यांनी व नेटकऱ्यांनी उलट-सुलट चर्चा करण्यास सुरुवात केली होती.
नीरजने यावर तीव्र आक्षेप घेत, “माझ्या वक्तव्याचा वापर तुमचा घाणेरडा अजेंडा पसरवण्यासाठी करू नका. खेळ आपल्या सर्वांना एकत्र यायला शिकवतो.” असं ट्विट केलं आहे. यासोबतच त्याने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
व्हिडिओद्वारे नीरजने, त्याला दिलेल्या पाठिंब्याबाबत सर्व देशवासीयांचे आभार मानले. तसेच, “एका मुलाखतीदरम्यान मी पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याच्याकडून भाला घेतल्याचे सांगितले होते. मात्र या सध्या घटनेचा आता मोठा मुद्दा बनवण्यात आला आहे. आपला वैयक्तिक भाला स्पर्धेत सहभागी झालेले इतर कोणतेही खेळाडू वापरू शकतात. हा नियम असून यामध्ये काहीही चुकीचे नाही.”
“नदीम माझा भाला घेऊन सराव करत होता. मी त्याला माझ्या थ्रोसाठी भाला मागितला. ही बिल्कुलही मोठी गोष्ट नसून मला खेद आहे की, माझ्या वक्तव्याचा आधार घेऊन याला मोठा मुद्दा बनवलं जातंय. मी सर्वांना विनंती करतो की असं करू नका. खेळ सर्वांना एकत्र घेऊन चालणं शिकवतो. आम्ही सर्व खेळाडू एकमेकांसोबत प्रेमाने राहतो. त्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या चर्चा करून आमच्या भावना दुखावू नयेत.” असं आवाहन त्याने केलं.
मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021