Nilesh Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे यांची भेट घेत चर्चा केली होती. यावरून आता खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विनायक राऊत म्हणाले, “राजकीय नाटक कसे करायचे हे राणे कुटुंबाकडून शिकून घ्यावं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण दौऱ्यात आले असताना निलेश राणेंना कुठं स्थान मिळालं, हे लोकांनी पाहिले आहे.”
पुढे ते म्हणाले, “फडणवीसांनी सांगितल्यामुळे निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे. पण, ही फार दिवस चालणार नाही. निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिले आहे.
निलेश राणे काय म्हणाले होते?
निलेश राणे यांनी ‘एक्स’ (ट्वीटर) वर निवृत्तीची घोषणा करत लिहिले होते की, “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपामध्ये खूप प्रेम भेटलं. भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.”