श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील 14 जिल्ह्यांमध्ये जमात ए इस्लामीशी संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने छापे घातले आहेत.
जम्मू -काश्मीरमधील श्रीनगर, बडगाम, गंदरबल, बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियां, पुलवामा, कुलगाम, रामबन, दोडा, किश्तवाड आणि राजौरी या जिल्ह्यांमध्ये 56 ठिकाणी हे चापे घालण्यात आले, असे एनआयएने म्हटले आहे. जमात ए इस्लामी या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या विभाजनवादी कारवायांबेबत केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार हे छापे घालण्यात आले.
जमात ए इस्लामी ही संघटना देशांतर्गत आणि विदेशातून झकात, मौदा आणि बोल्त उल माल या संघटनांच्यावतीने देण्ग्या स्वीकारत असे. समाजकार्यासाठी ही देणगी स्वीकारण्यात येत असे. मात्र त्याचा विनियोग घातपाती आणि विभाजनवादी कार्यासाठीच केला जायचा, असे एनआयएने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जमात ए इस्लामीने देणग्यांच्यामाध्यमातून उभा केलेला हा निधी हिज्बुल मुजाहिदीन, लष्कर ए तोयबा आणि जमात ए इस्लामीच्या संपर्कातील अन्य दहशतवादी संघटनांनाही पुरवला जात असे. जमात ए इस्लामीकडून काश्मीरमधील युवकांना भडकावले जात असायचे. त्यातूनच विघातक कार्यातील नवीन तरुणांची भरती देखील केली जात असायची असेही एनआयएनेम्हटले आहे.