धाराशिव – तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्ट, उत्तेजक आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही, असा फलक लावत तुळजाभवानी मंदिर संस्थानने अजब नियमावली जारी केली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर मंदीर प्रशासनाने “यु टर्न’ घेत आपला निर्णय मागे घेतला आहे. “तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांवर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत,’ असे स्पष्टीकरण मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले आहेत.
भारतीय राज्य घटनेनुसार नागरिकांनी कोणते कपडे घालावेत, काय खावे, काय प्यावे याचे स्वातंत्र्य आहे. तरीही हा निर्णय घेतल्याबद्दल भाविकांमधून आश्चर्य व्यक्त झाले. त्यानंतर मंदीरातील पुजाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत समाजमाध्यमांवरून मिम्स् व्हायरल झाले.
मंदिर समितीच्या नवीन नियमांनुसार हाफ पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट घालणाऱ्या महिला व पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. तसेच महिलांना वन पीस आणि शॉर्ट स्कर्ट घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही. अशा सूचना देणारे फलकही गुरुवारी सकाळी मंदिर परिसरात लावण्यात आले होते.
ज्यामध्ये, “अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा,’ असे आवाहन केले होते. हा निर्णय घेतल्याबद्दल पुजारी वर्गाकडून तांदळे यांचा सत्कारही झाला. अचानकपणे लादलेल्या या नियमांचा फटका भाविकांना बसला. एका 10 वर्षीय मुलालादेखील सुरक्षा रक्षकांनी दर्शन घेण्यापासून अडवले. त्यामुळे भाविकांमध्ये असलेली नाराजी, रोष पाहता तुळजाभवानी मंदिर संस्थानला ड्रेस कोडवरून “यु टर्न’ घ्यावा लागला.
240 कोटींचे दान
दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यामुळे गेल्या 13 वर्षांत मंदिराचे रोख व सोन्या-चांदीच्या स्वरूपातील उत्पन्न तब्बल 10 पट वाढले आहे. 2010 मध्ये मंदिराकडे भाविकांनी वाहिलेले 21 किलो सोने होते. 13 वर्षांत यात सुमारे 187 किलोची भर पडली असून मंदिराकडे आता 208 किलो वाहिक सोने आणि 3 हजार 404 किलो चांदी आहे. रोख रकमेचे दानही वाढले असून देणग्या आणि एकूण उत्पन्नामुळे मंदिराकडे 40 कोटींवरून 240 कोटी 97 लाख, 60 हजार रुपये जमा झाले आहेत. याशिवाय पुरातन काळापासून राजा-महाराजांनी मातेला वाहिलेले अमूल्य असे 7 पेट्या भरून दागिने मंदिराकडे आहेत.