सातारा – वर्षानुवर्षे एकाच पोलिस ठाण्यात, शाखेत ठाण मांडून बसलेल्या पोलीस दादांच्या बदल्या करण्याचे संकेत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
यंदा करोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात होणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, त्या बदल्या 31 मे अखेर करण्याबाबत सामान्य प्रशासनाचा आदेश आल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात बदल्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका पोलिस ठाण्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश एसपींनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत.
याबाबत डीवायएसपी स्तरावरील अधिकार्याच्या सहीचा आदेश आज (दि.15) बिनतारी संदेशाने पाठवण्यात आला आहे.
अशा पोलीस दादांच्या नावाची यादी दोन दिवसात तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना शाखेत देण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.