मुंबई – भारतातून परत जात असलेले परदेशी गुंतवणूक, अमेरिकेच्या डॉलरचा वाढत असलेला भाव, रशिया -युक्रेन युद्धाची वाढत असलेली दाहकता. क्रुडच्या वाढत असलेल्या बेसुमार किमती त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर गेल्या पंधरा दिवसांमध्ये नकारात्मक परिणाम झाला आहे. सोमवारी रुपयाचा 93 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 77.10 रुपये प्रति डॉलर झाला. ही रुपयाच्या दराची नीचांकी पातळी आहे.
रशिया- युक्रेन युद्ध आणि क्रुडचे वाढत असलेले दर यामुळे देशातील महागाई उसळण्याची आणि व्यापारातील तूट वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रुपयाचा दर कोसळत असल्याचे चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक परत जाण्याबरोबरच शेअर बाजाराचे निर्देशांकात कोसळत आहेत. त्याचाही रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे.
रेलिगेअर ब्रोकिंग या कंपनीच्या उपाध्यक्ष सुगंधा सचदेव म्हणाल्या की, केवळ क्रुडचे दर वाढत नाहीत तर जगातील सर्वच वस्तूंचे दर वेगाने वाढत आहेत. त्यामुळे भारताला आयात करताना भयंकर अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत भारताची व्यापारातील तूट आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतातील गुंतवणूक फायदेशीर होणार नसल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी शुक्रवारी 7,631 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.