इरी – अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आपण गेल्यावेळी मिळालेल्या मताधिक्क्यापेक्षा अधिक मतांनी जिंकू असा विश्वास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आज पेन्सिलव्हेनिया प्रांतातील प्रचारसभेत बोलताना त्यांनी बिडेन व कमला हॅरिस अमेरिकेचे रूपांतर सोशॅलिस्ट देशामध्ये करतील, असा इशाराही त्यांनी केला.
या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच ट्रम्प यांच्या आगमनाला उशीर होऊनही गर्दीचा उत्साह कायम होता याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, 3 नोव्हेंबरच्या आपल्या भरभक्कम विजयाचीच ही नांदी आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीतील जनमत चाचण्यांमध्ये बिडेन आघाडीवर दिसत असले तरी ट्रम्प यांच्या प्रचार सभांना मात्र तुफान गर्दी होत आहे. त्यामुळे अजूनही ही स्पर्धा खुली असल्याचे संकेत मिळत आहेत. ट्रम्प यांनी यावेळी विरोधी पक्षाचा जोरदार समाचार घेतला.
बिडेन यांचा उल्लेख ते सातत्याने झोपाळू बिडेन असा करीत असून कमला हॅरिस यांचा उल्लेखही ते क्रुकेड असा करीत आहेत. अमेरिकेला आपण आर्थिक संकटापासून वाचवल्याचा दावा करून ते म्हणाले की करोनाच्या काळात बिघडलेली अर्थिक स्थिती आपण रूळावर आणली असून बेरोजगारीचा दर एक अंकावर आणला आहे.
पुढील वर्षी बेरोजगारीचा दर आणखी कमी होईल, असे ते म्हणाले. अमेरिकेत चीनमधून करोना आला, असा आरोप करून ते म्हणाले की, अमेरिकेतील करोना आम्ही संपवत आणला आहे. पेन्सिलव्हेनिया प्रांतात आपल्याला विजय मिळाला तर आपण सर्वत्रच मोठा विजय प्राप्त करून त्यांनी येथील नागरिकांना अमेरिकेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हाला मतदान करा, असे आवाहन केले.