पुणे – प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील हे नाव सध्या राज्यभरात ट्रेंडिंगला आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम पाहण्यासाठी चाहते चक्क एका पत्राच्या घरावर चढले होते आणि गर्दी वाढल्यामुळे सर्वजण खाली कोसळले. या घटनेत काहींना दुखापतही झाली. तसेच अनेकदा व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे की गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी उंच झाडावर देखील चाहते चढले होते. तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.
दरम्यान अशातच एक रजेचा अर्ज व्हायरल होत आहे. हा रजेचा अर्ज एसटी महामंडळातील चालक कर्मचाऱ्याचा आहे. त्याने त्या अर्जात ‘गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे हा अर्ज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, गौतमी पाटील ही पहिल्यांदा तीच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली. ‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाही’ या गाण्यावर नृत्य करत असताना तीने अश्लील हावभाव केले होते. त्यावरून तीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तीला विदर्भरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी तीचा एक वस्त्र बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तीच्याबाबत अनेकांनी सहानुभूती दाखवली होती.
गौतमी पाटील आता मोठी सेलिब्रिटी झाली असून तीच्या कार्यक्रमाला पोलीसांचाही बंदोबस्त असतो. तसेच तीचे वैयक्तिक अंगरक्षक देखील तीच्या संरक्षणासाठी तैनात असतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला की चर्चा होणार आणि प्रसिद्धी मिळणार या हेतून अनेकजणांचा तीचा कार्यक्रम ठेवण्याकडे कल दिसून येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी चक्क बैलाच्या वाढदिवसालाही गौतमीचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता.
गौतमी पाटीलने गेल्या काही दिवसांपूर्वी तीच्या लग्नाबाबत वक्तव्य केले होते. मला पैसेवाला नको मात्र मला आणि माझ्या आईला सांभाळणारा नवरा पाहिजे असे मत तीने प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते. या विधानावरही सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. दरम्यान राज्यात सध्या गौतमी पाटील चर्चेत आहे. आणखी किती दिवस तीची ही प्रसिद्धी क्रेझ कायम राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.