मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रसिद्ध गायक आहेत. त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. युट्यूबवर टी-सिरीज या चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला आठ तासात तब्बल 11 लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
यावेळी त्या पंजाबी मूडमध्ये दिसत आहेत. आज मैं मूड बना लिया, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. बॅचलर्सवर हे गाणे आधारित आहे. नवीन गाण्यात अमृता या गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत.
टी सिरीजवर या गाण्याचा टिझर 5 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्याची वाट पाहात होते. तसेच अमृता फडणवीस यांनीही तीन दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन गाण्याचे पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते. दरम्यान, अमृता फडणवीस या एक बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली असून त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.