आळंदी – साईराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 450 नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यांना आवश्यकता आहे अशा नागरिकांची पुढील शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
आळंदी नगरपरिषदेचे गटनेते पांडुरंग वहिले यांच्या वाढदिवसानिमित्त या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनिल टिंगरे, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, नगरसेवक सागर भोसले, भाजप महिला मोर्चा कोषाध्यक्ष शैला मोळक, माऊली रायकर, राहुल घोलप, सचिन काळे, कुमार खालापुरे यांनी शिबिरास भेट देऊन वहिले यांना शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री संजय भेगडे म्हणाले, अलिकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसासाठी अनावश्यक खर्च केला जातो. मात्र, पांडुरंग वहिले यांनी वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
पांडुरंग वहिले म्हणाले, प्रत्येकजण काही ना काही आजाराने ग्रस्त असतात. अनेकांना परिस्थितीमुळे योग्य उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्या नागरिकांना पुढील उपचाराची गरज आहे त्यांनाही मदत केली जाणार आहे. या छोट्या प्रयत्नामुळे काही नागरिक आजारमुक्त होणार याचे मनाला समाधान मिळते.