पुणे : न्यायालयांचे कामकाज 11 जानेवारीपर्यंत एकाच सत्रामध्ये

पुणे(प्रतिनिधी) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील न्यायालयांचे कामकाज 11 जानेवारीपर्यंत एकाच सत्रामध्ये सुरू राहणार आहे. त्यामुळे यापुढेही दोन्ही शहरातील न्यायालयांचे कामकाज तत्काळ आणि महत्त्वाच्या दाव्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे.

पक्षकारांना न्याय मिळण्यास होत असलेला उशीर आणि वकिलांचे थांबलेले उत्पन्न या विचार करता न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यासाठी पक्षकार आणि वकिलांना आता आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

न्यायालयाचे कामकाज नियमित न झाल्याने दाव्यांच्या सुनावणीला होत असलेला विलंब कायम राहणार आहे. याचा सर्वाधिक परिमाण दिवाणी दाव्यांवर होत आहे. तर पूर्ण क्षमतेने सुनावणी होत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या वकिलांच्या प्रॅक्‍टिसला फटका बसणार आहे.

याविषयी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सचिन हिंगणेकर म्हणाले, नवोदीत वकिलांना न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू नसल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नियमित कामकाज सुरू करण्याची नवोदीत वकिलांची मागणी आहे. दिवाळीनंतर कामाची वेळ टप्प्याटप्याने वाढविण्यात यावी अशी आमची मागणी होती. करोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी न्यायालयीन परिसरात खबरदारी घेण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.