मुंबई – राज्य शासनामार्फत दि. 1 व 2 जून 2023 रोजी रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
रायगडावर सोहळ्यानिमित्त रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा तसेच सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटलायझेशन हे उपक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत.