नेवासा- आपल्या आजारी पत्नीची गेली 10 वर्षांपासून पतीराजाकडून अविरतपणे सेवा सुरू आहे. आयुष्यात जीवन प्रवासात सुखदुःखाच्या काळातही पत्नीवर असलेले प्रेम पाहून भेटण्यासाठी आलेल्यांना अश्रू अनावर होत आहेत. पती जीवनसाथीच्या चांगुलपणाची आठवण काढून ढसाढसा रडत असल्यामुळे जगाला जीवनसाथीचे खरे प्रेम नेवासा फाटा येथे परदेशी यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पहावयास मिळत आहे.
नेवासा फाटा येथील रणजित परदेशी हे मुळा पाटबंधारे विभागात चालक म्हणून नोकरीस होते. नोकरी करून ते सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा विवाह सन 1979 मध्ये झाला. त्यांना तीन मुली असून त्यांचे लग्नही झालेले आहे. परदेशी दाम्पत्यास पाच नातूही आहेत. मुलींचे लग्न झाल्यानंतर सुखाने रहात असताना सन 2012 पासून त्यांच्या पत्नी मिना परदेशी (वय 61) यांचे ब्रेन ऑपरेशन झालेे. पाठीच्या मणक्यात गॅपही आहे. गुडघे कामातून गेलेले आहेत. त्यामुळे ते आपल्या पत्नीला स्वत: अंघोळ घालून स्वयंपाक करून पत्नीला वेळेवर गोळ्या, औषधे देतात. तिला जेवू घालून गाणे गात झोपी लावत असतात. असाच दिनक्रम अविरतपणे सुरू आहे.
गेल्या 10 वर्षांपासून पत्नी आजारी असतानाही पती न थकता पत्नीला आनंदात ठेवत आहे. घरात आजारी पत्नी झोपून थकल्यानंतर पुन्हा व्हिलचेअर सायकलवर राऊंड मारून गाणे म्हणत पती रणजितसिंग परदेशी ढसाढसा रडत असल्याने पत्नीवरील प्रेम अन् विश्वास बघून सर्वजण अवाक् होताना दिसत आहेत.
हल्लीच्या युगात पतीच्या त्रासामुळे विवाहिता आत्महत्या करत असल्याच्या घटना घडताना दिसत आहे. तर दुसरीकडे परदेशी यांचे त्यांच्या पत्नीवरील प्रेम बघून अनेकांना आनंदाश्रू येत आहे. परदेशी सांगतात की, मला प्रचंड वाचनाची सवय आहे. पत्नी आणि माझी अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी सारखी जोडी होती. तिने मला अडचणीत खूप जीव लावला. आम्ही जीवनात कधीही एकमेकांशी भांडणे केली नाही. आम्हाला तीन मुली असून त्यांचे लग्न करून दिले आहे. पत्नी आजारी असल्यामुळे माझ्या नशिबी आलेल्या दुखण्याचा मी आनंदाने स्वीकार करत असून, असे दुखणे इतरांच्या नशिबी नको, एवढीच देवाला प्रार्थना असल्याचे रणजितसिंग परदेशी यांनी सांगत अश्रूंना मोकळी वाट करून दिली.