नेवासा – भारतीय जनता पार्टी या पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी असलेल्या तालुका पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांचीच बदनामी सोशल मीडियीत करुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रावस्था निर्माण केल्यामुळे सोशल मीडिया चालविणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहीती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात फुलारी यांनी म्हटले आहे की, देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या आदेशानुसार नेवासा तालुक्यामध्ये पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाचे संघटनात्मक काम सुरु असतांना जाणीवपूर्वक पक्षाच्या विचारधारेविरुद्ध पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची व नेत्यांची बदनामी करणाऱ्या धामोरी (ता.नेवासा) येथील अदिनाथ रावसाहेब पटारे व गोमळवाडी येथील हरिश सुदाम गाडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहीती यावेळी त्यांनी दिली.
पक्षात राहून पक्षाच्या नेत्यांचीच बदनामी करुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रावस्था निर्माण केल्याप्रकरणी दोन पदाधिकाऱ्यांवर पक्षाने कारवाईचा बडगा उगरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापुढील काळातही पक्षाची व पक्षातील नेत्यांची बदनामी केल्यास पक्ष कारवाई करणार आहे, असे फुलारी म्हणाले.