पुणे – मेडिकल प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “नीट’, देशभरातील आयआयटीसह अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असलेली “जेईई मेन’सह अन्य विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावरच्या प्रवेश परीक्षेची योग्य पद्धतीने तयारी करणे शक्य होणार आहे.
“नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जाते. “एनटीए’ने प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जेईई मेन दोन टप्प्यात होणार आहे. जेईई परीक्षेचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत तर दुसरा टप्पा 1 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे नीट परीक्षा 5 मे रोजी होणार आहे. ऑनलाइन परीक्षांचे निकाल परीक्षेनंतर तीन आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी एनटीएकडून दरवर्षी काही महिने आधी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. यंदाही वेळापत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. देशभरातील केंद्रीय, सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-यूजी) 15 ते 31 मे दरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा सीयूईटी-पीजी 11 ते 28 मार्च या कालावधी घेण्यात येणार आहे. परीक्षांबाबतची सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना प्रसिद्ध केली जाईल.
नेट परीक्षा 10 जूनपासून
देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आले आहे. नेट परीक्षा 10 ते 21 जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.