प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील “नीट’ ही प्रवेश परीक्षा दि. 13 सप्टेंबरला झाली. या परीक्षेची उत्तरतालिका (ऍन्सर कीज्) “नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वत:च्या गुणांची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरात करोना प्रादुर्भावाच्या काळात योग्य त्या आरोग्यविषयक खबरदारीसह नीट परीक्षा पार पडली. सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. देशभरात 3,900 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर ही तीन तासांची पेन-पेपर परीक्षा दिली गेली. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले होते.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) झालेल्या नीट परीक्षेची उत्तरतालिका अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. ज्या उमेदवारांनी नीट परीक्षा दिली, त्यांना नीटची उत्तरतालिका पडताळून पाहता येईल. सर्व सेट्ससाठी उत्तरतालिका जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी गुणांची पडताळणी करावी. अंतिम उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे “एनटीए’ने स्पष्ट केले आहे.
उत्तरतालिकेबाबत कोणाला काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्याबाबतची सविस्तर सूचना नंतर जारी केली जाईल. मात्र, सध्या कोणत्याही प्रकारचे मेल विद्यार्थ्यांनी करू नये, हरकतींविषयीची स्वतंत्र सूचना करणयात येणार असल्याचे “एनटीए’ने म्हटले आहे.