पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची आज (दि. 12) नियुक्ती करण्यात आली आहे. तर, युवकच्या शहराध्यक्षपदी इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन आजची पदाधिकारी निवड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या निवडींद्वारे मराठा, मुस्लिम, माळी, मागासवर्गीय, ओबीसी, शेट्टीसह सर्व जातीमधील कार्यकर्त्यांना संधी देत राष्ट्रवादीने अचूक सोशल इंजिनिअरिंग साधले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांच्याजागी अजित गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे उच्च शिक्षित, शांत, संयमी, मितभाषी आहेत. त्यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून मराठा चेहरा देण्याचा प्रयत्न करताना महिला शहराध्यक्ष म्हणून कविता आल्हाट यांना संधी दिल्याने माळी समाजालाही पक्षामध्ये मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरात मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजालाही आपलेसे करण्यासाठी युवकची जबाबदारी इम्रान युनुस शेख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पहिल्यांदाच मराठेतर समाजाला पक्षपातळीवर मोठे स्थान दिले आहे.
तीन कार्याध्यक्षांची नियुक्ती
शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आला असून या नियुक्त्याही अत्यंत विचारपूर्वक करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठा, ओबीसी आणि शेट्टी समाजाला प्राधान्य देण्यात आले आहे. पिंपरीची जबाबदारी जगदीश शेट्टी यांच्याकडे, चिंचवडची प्रशांत शितोळे यांच्याकडे तर भोसरी विधानसभेची जबाबदारी राहूल भोसले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या तीन मतदारसंघासाठी युवकचे देखील कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून यामध्येही उत्तम मेळ साधण्यात आला आहे. पिंपरी विधानसभेसाठी निलेश निकाळजे, चिंचवडसाठी प्रसन्न डांगे तर भोसरीसाठी योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कार्याध्यक्षपदी चिंचवड मधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीची जबाबदारी योगेश बहल यांच्याकडे
महापालिकेची अवघ्या काही दिवसांवर सार्वत्रिक निवडणूक आली आहे. या निवडणुकीच्या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महापालिकेत सत्ता आणण्याची जबाबदारी आता गव्हाणे आणि बहल यांच्यावर सोपविल्याचेही या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.