मुंबई – आजच्या या दिवशी माझा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि खासदार शरद पवार साहेबांना शब्द आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रॉमिस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईनचा माहोल आहे. क्षेत्र कोणतेही असो आपापल्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करण्याचा मार्ग निघतोच. व्हॅलेंटाईन आठवड्यातला प्रॉमिस डे हा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा असतो. राज्याच्या राजकारणात आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या आपल्या वक्तव्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.आज प्रॉमिस डे असल्याचं कळताच जयंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रॉमिस केले.
राष्ट्रवादीची वाटचाल गेल्या काही वर्षात जयंत पाटील यांच्या नेतृत्वात चांगली झाली आहे, असे राजकीय जाणकार सांगत असतात. अशात राजकीय जाणकारांना विचार करायला लावणारे प्रॉमिस पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जयंत पाटील हे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. तरूणांमध्ये त्यांच्या वक्तव्याची क्रेझ असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अशातच आता चक्क व्हॅलेंटाईन आठवड्यात हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्यानं ते चर्चेत आहेत.