- ऑनलाईन सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याची तक्रार
पिंपरी – स्थायी समिती अध्यक्षांवरील लाचखोरीच्या आरोपावरुन आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांना आजच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी न दिल्याने या नगरसेवकांनी थेट महापौर माई ढोरे यांच्या दालनाकडे धाव घेतली. महापौरांना घेराव घालत, राजीनाम्याची मागणी केली. लाचखोरीची चौकशी सुरू असल्याने सत्य समोर येईल, असे सांगत महापौरांनी राजीनाम्यास नकार दिला. त्यानंतर राष्ट्रवादीने ही सभाच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, ही सभा रद्द ठरवून पुन्हा घेण्याची मागणी केली. ही मागणीदेखील महापौरांनी धुडकावून लावल्याने महापौरांच्या दालनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
दोन दिवसांपुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.20) महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन आयोजित केली होती. या सभेत सहभागी होण्यासाठी नगरसेवकांसाठी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात व्यवस्था करण्यात आली होती. या सभेला शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेचे नगसेवक उपस्थित होते. दुपारी दोन वाजता सभा सुरु होताच, महापौर ढोरे यांनी विषय मंजुरीचा सपाटा लावला. विरोधी गटाच्या नगरसेवकांना या सभेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन संधीच न दिल्याने, ते या सभेत आपले मत मांडु शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनाकडे धाव घेतली. मात्र, महापौर ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी असल्याने दालनाचा दरवाजा बंद करण्यात आला होता. महापौरांच्या दालनात भाजपचे नगरसेवक उपस्थित असून, आम्हालादेखील या सभेत सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणी या नगरसेवकांनी केली. मात्र, दालानाचा दरवाजा न उघडल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी भाजपविरोधी घोषणाबाजी करत, महापौर दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
सर्वसाधारण सभा ऑनलाईन (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) पद्धतीने होत असली, तरीदेखील स्थायी समिती अध्यक्षांच्या अटकेवरून विरोधी पक्षाकडून गोंधळ होऊ शकतो, या अंदाजाने तिसऱ्या मजल्यावर महापालिका सुरक्षारक्षकांबरोबरच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या या ठिय्या व घेराव आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली.
महपौर दालनासमोरील ठिय्या आंदोलनादरम्यान माजी महापौर योगेश बहल यांनी महापौरांवर गंभीर आरोप केले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, अजित गव्हाणे, नाना काटे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, शाम लांडे, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, संगीता ताम्हाणे, राहुल कलाटे, ऍड. सचिन भोसले आदी सहभागी झाले होते.
36 वर्षांतील काळा अध्याय
पिंपरी-चिंचवड महापालिकेत घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी असून आज नगरसेवकांना न बोलू देता महापौरांनी अवघ्या आठ मिनिटांत सर्वसाधारण सभा गुंडाळली. या सभेमध्ये 18 विषय मंजूर करणाऱ्या महापौरांनी गेल्या 36 वर्षांमधील एक काळा अध्याय लिहिला आहे. विरोधीपक्षांच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी न दिल्याने ही सभाच बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही सभा रद्द करण्याची मागणीही योगेश बहल यांनी यावेळी बोलताना केली