- स्थायी अध्यक्ष अटक प्रकरण
- आमदार मिसाळ यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा
पिंपरी – आमदार तथा पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या प्रभारी माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी (दि. 20) भाजप शहर कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थायी अध्यक्ष ऍड, नितीन लांडगे यांच्या अटकेबाबत भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. या चर्चेवरुन त्या अहवाल तयार करणार असून, तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सादर केला जाणार असल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
स्थायी समितीची सभा संपल्यानंतर बुधवारी (दि. 18) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारत, स्थायी अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह पाचजणांना अटक केली होती. या घटनेची भाजपच्या वरिष्ठ स्तरावर गंभीर नोंद घेण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी (दि.20) पक्षकार्यालयाला भेट दिली. या बैठकीला महापौर माई ढोरे, आमदार लक्षमण जगताप, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह काही मोजके भाजप पदाधिकारी उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे हे या बैठकीला अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी मोबाईलवरुन संपर्क साधत या बैठकीत सहभाग नोंदविला.
या बैठकीदरम्यान आमदार मिसाळ यांनी या घटनेची उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. या चर्चेतील मुद्द्यांच्या आधारे त्या अहवाल तयार करणार आहेत. तसेच हा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सादर करणार असल्याचे ढाके यांनी सांगितले.