“पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार हे लायक नेते; पंतप्रधान नरेंद्र मोदींना…”

नवी दिल्ली – पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. जनता दला युनायटेडचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी याबाबत भाष्य करताना, ‘नितीश कुमार हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी लायक नेते आहेत’ असा विश्वास व्यक्त केला.

बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडी(यू) व भाजपचे सरकार सत्तेत आहे. यंदा बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली तर नितीश कुमारांच्या जड(यू)च्या जागा कमी झाल्या. मात्र निवडणुकांपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपदाची माळ नितीश कुमार यांच्या गळ्यात पडली.

आज जनता दलाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष असलेल्या उपेंद्र कुशवाह यांनी, पंतप्रधानपदा-बाबत वक्तव्य करत नितीश कुमार हे देखील पंतप्रधानपदासाठी लायक नेते असल्याचं सांगितलं.

काय म्हणाले कुशवाह?

“देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना भारताचं पंतप्रधान बनवलं. ते त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करतायेत. मात्र देशात पंतप्रधानपदासाठी अन्यही लायक नेते आहेत. त्यात एक नाव नितीश कुमार यांचं देखील घ्यावं लागेल. नितीश कुमार यांना पंतप्रधानपदासाठी लायक नेते आहेत. आणि याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याशी काही संबंध नाही.” असं कुशवाह यांनी म्हंटलं.

२०१३ मध्ये नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तीव्र  नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी जेडी(यू) एनडीएमधून बाहेर देखील पडला होता. “देशाला दुभंगणारी विचारसरणी असलेल्या नरेंद्र मोदींना देशाची जनता कधीच स्वीकारणार नाही.” असं थेट वक्तव्य नितीश कुमार यांनी त्यावेळी केलेलं.

२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दल युनायटेडच्या एका नेत्याने, ‘नितीश कुमार यांना  पंतप्रधानपदासाठीचा चेहरा घोषित करा. असे न केल्यास एनडीएला बहुमत मिळणार नाही.’ असं वक्तव्य करून खळबळ माजवली होती. नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये नेहमीच रंगते. मात्र कुशवाह यांनी आज माध्यमांशी बोलतानाच हा विषय छेडला आहे.           

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.