नांदेड-पुणे द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत, टर्मिनल मध्ये आणि रचनेत बदल करण्यात आला आहे. नवीन वर्षात ही गाडी नांदेड-हडपसर-नांदेड अशी धावेल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या गाडीला जालना रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. गाडी संख्या १२७३०/१२७२९ नांदेड-पुणे द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस च्या वेळेत, स्थानकात (टर्मिनल) आणि रचनेत बदल करण्याचे रेल्वे बोर्डाने मान्य केले आहे.
हा बदल दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकातून निघणाऱ्या गाडीला आणि दिनांक 3 जानेवारी, २०२२ रोजी हडपसर येथून सुटणाऱ्या गाडीला लागू होईल.
तसेच हि गाडी आता पुणे स्थानका ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि तेथ पर्यंतच पोहोचेल. या गाडीचे टर्मिनल पुणे ऐवजी हडपसर असे करण्यात आले आहे. ही गाडी नवीन वर्षात नांदेड-हडपसर-नांदेड अशी धावेल.
या गाडीच्या रचनेत बदल करून तिला एल.एच.बी. कोचेस लावण्यात आली आहेत. दिनांक २ जानेवारी पासून या गाडीत २० डब्बे असतील.
दरम्यान, गाडी संख्या १२७३० हि गाडी दिनांक २ जानेवारी पासून, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सप्ताहातून दोन दिवस रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी १८.३० मिनिटांनी सुटेल. जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे हडपसर येथे सकाळी ०६.५५ वाजता पोहोचेल.
तर गाडी संख्या १२७२९ हि गाडी दिनांक 3 जानेवारी पासून, हडपसर रेल्वे स्थानकावरून सप्ताहातून दोन दिवस सोमवारी आणि बुधवारी रात्री २२.०० वाजता पोहोचेल आणि औरंगाबाद, जालना मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.