पारनेर – नगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी आवाज उठविताच ते शरद पवार यांच्या गोटात दाखल झाल्याच्या वावडया उठविल्या जात आहे. शरद पवारांशी आ. लंके किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांची गुप्त भेट घेतील नसल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे यांनी स्पष्ट केले.
पुण्यासह इतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होतो. तेथील पालकमंत्री दुष्काळ जाहीर करून घेण्यात यशस्वी होतात. नगर जिल्ह्यातील प्रस्थापित मात्र त्यात यशस्वी होत नाहीत., हे दुर्देव आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आ. लंके यांना लक्ष्य करण्यात येत असून लगेच त्यांचा संबंध शरद पवारांशी जोडला जातो.
विकासाच्या मुद्दावर अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचे आ. लंके यांनी स्पष्टपणे जाहीर केलेले असताना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच कुठे येतो? असा सवाल धाडगे यांनी केला.
आ. लंके हे सत्तेत आहेत. परंतू शेतकरी हितासाठी त्यांनी भूमिका घेतली तर बिघडले कुठे? मोहटादेवी देवदर्शना दरम्यान आमदार प्रा. राम शिंदे व आ. लंके यांची भेट झाली. देवदर्शन यात्रा हा राजकारणाचा भाग नसतानाही महाआघाडीचे घटक म्हणून प्रा. राम शिंदे यांची भेट झाली तरीही शरद पवार यांच्याशी संबंध जोडला जातो.
आ. लंके यांची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने समाजमाध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये. आ. लंके यांना कोणतीही गुप्त बैठक घेण्याची आवश्यकता नसल्याचे धाडगे म्हणाल्या. आमदार लंके शरद पवारांना भेटले असून ते नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी उमेदवारी करणार असल्याची चर्चा घडवून आणली जात आहे. या वेगवेगळ्या चर्चेमुळे जिल्ह्यात चर्चांना उत आला आहे.
शरद पवार आमचे दैवत असून साहेबांच्या सोबत अशी कोणतीही गुप्त बैठक झालेली नाही. गुप्त बैठकीची आम्हाला आवश्यकता नाही. समाज माध्यमातून गैरसमज कसा होईल व दुसऱ्याची बदनामी कशी होईल, असा काहींचा हेतू दिसत आहे. सध्या जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा समाजहिताच्या कामाला आम्ही महत्व देतो.
नीलेश लंके, आमदार