कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या व नव्याने करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मंगळवार (दि.५) रोजी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री प्राप्त केल्यापासून आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणून मतदार संघातील अनेक प्रलंबित विकासकामे सोडवून चार वर्षात मतदार संघाचा शाश्वत विकास करून दाखविला आहे. यामध्ये अजून भर पडली असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या सयुंक्त प्रयत्नातून कोपरगाव मतदारसंघातील चांदेकसारे व सोनेवाडी परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी महायुती सरकारने मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे.
त्यानंतर बरोबर आठच दिवसांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी कोपरगाव दौऱ्यावर येत असून मंगळवारी (दि.०५) ते संपूर्ण दिवस कोपरगाव मतदार संघात राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्यासाठी सकाळी दहा वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विखे पाटील यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर अकरा वाजता माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन व सुरेगाव येथील शासकीय वाळू डेपोचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. कुंभारी येथील शासकीय वाळू डेपोचे देखील उद्घाटन होणार आहे. दुपारी एक वाजता संवत्सर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत संवत्सर-कान्हेगाव वारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दुपारी दीड वाजता संवत्सर येथील श्री शनि महाराज मंदिरासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन घेऊन चार वाजता गोदावरी खोरे दूध संघाच्या सोलर प्लँटचा पायाभरणी शुभारंभ तसेच लोकनेते नामदेवराव परजणे पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा त्यांच्याहस्ते पार पडणार आहे. सायंकाळी पाच वाजता कोपरगाव शहरातील निवारा कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ व शहरातील व्यापारी तसेच नागरिकांशी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हितगुज साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली.
मंत्री पाटील व आ. काळेंचा नागरी सत्कार
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या सयुंक्त प्रयत्नातून कोपरगाव मतदारसंघात एमआयडीसी उभारण्यावर महायुती सरकारने शिक्कामोर्तब केले. हा मतदारसंघाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय असून, त्यामुळे बेरोजगार युवकांच्या भविष्यात आशेचा किरण निर्माण होवून युवा वर्गाला नवी उमेद मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.